अमिताभ बच्चन यांना नाट्यसंमेलनात आणण्याचा प्रयत्न करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

9

सोलापूर  : अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुरात जानेवारी महिन्यात १०० व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन अभिनेते भाऊ कदम आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या सह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. पुणे विभागात पिंपरी चिंचवड व सोलापूर येथे हे नाट्यसंमेलन आयोजित केले जाणार असून, सोलापूरचे नाट्य संमेलन दिनांक 20 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे. हे नाट्यसंमेलन 100 वे असल्याने सर्व सोलापूरकरांच्या सहकार्यातून दर्जेदार नाटकासह येथे येणाऱ्या सर्वांना उत्कृष्ट सोयी सुविधा देऊन संपूर्ण देशभरात आदर्शवत ठरेल असे संमेलन केले जाणार असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

यावेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने, संमेलनाचे कार्याध्यक्ष माजी आमदार प्रकाश यलगुलवार,   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर,   अखिल भारतीय उपनगरीय शाखेचे अध्यक्ष तथा नाट्यपरिषद मुंबईचे कार्यकारणी सदस्य विजय दादा साळुंके, नाट्य परिषद चे सहकार्यवाह दिलीप कोरके नियमक मंडळ सदस्य सुमित फुलमामडी, समन्वयक कृष्णा हिरेमठ,  विश्वनाथ आव्हाड, प्रशांत बडवे, तेजस्विनी कदम, सोमेश्वर घाणेगावकर, मोहन डांगरे उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, सोलापूरच्या वैभवाला साजेसे संमेलन व्हावे ही सर्व सोलापूरकरांची भावना आहे. यानुषंगाने, संमेलनासाठी निधी व अन्य कशाचीही कमतरता भासू देणार नाही, याबाबत यापूर्वीच आश्वस्त केले आहे. त्यामुळे सर्वांच्या मदतीने १०० वे विभागीय मराठी नाट्य संमेलन यशस्वी आणि भव्यदिव्य करु असे याप्रसंगी पाटील यांनी आश्वस्त केले. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील त्यांनी याप्रसंगी दिली.

मराठी नाट्य परिषदेने या संमेलनासाठी प्रख्यात सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांना आणण्याची जबाबदारी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्यावर सोपवलेली आहे. ती जबाबदारी शंभर टक्के पार पाडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून या संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महानायक अमिताभ बच्चन यांना आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.पाटील म्हणाले कि अमिताभ बच्चन यांच्याशी थेट संपर्क नसला तरी आपण त्यांना आणू शकतो. आशिष शेलार यांच्यासोबत बच्चन यांचा अतिशय चांगला परिचय आहे. त्यांच्या माध्यमातून सोलापुरात नाट्य संमेलनासाठी आणण्याचा प्रयन्त असेल.  बच्चन यांना पत्र पाठवू, त्यांना सोलापुरात आणण्यासाठी जी काही व्यवस्था करण्याची गरज असेल ती करू असे पाटील म्हणाले.

कलाकार भाऊ कदम यावेळी म्हणाले कि, गेल्या अनेक वर्षांपासून मी सोलापुरात येतो. सोलापूरकर मायाळू आहेत. यांच्या मायेची उब घेऊन आम्ही अभिनय करतो. सोलपूरकरांनी या नाट्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मी देखील नाट्य संमेलनाला येणार आहे असेही भाऊ कदम म्हणाले.

संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार म्हणाले कि, सोलापूर हि कलेची भूमी आहे. शतकोत्सवी  विभागीय नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयन्त करू. संमेलनाचे प्रमुख  कार्यवाहक विजय साळुंखे म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, बार्शी या ठिकाणी संमेलन पूर्व कार्यक्रम २० जानेवारी पासून होणार आहेत. या कार्यक्रम मध्ये नाट्यरसिकांना सहभागी व्हावे असे आवाहनही साळुंखे यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.