सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी शासकीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात येतो. सोलापूर जिल्ह्यात याच निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या व सुरू असलेल्या कासेगांव येथील वनविभागाच्या तसेच रांझणी येथील विविध विकास कामांची पाहणी पाटील यांनी रविवारी केली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी रांझणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम अपुर्ण असल्याने ते काम त्वरित पुर्ण करावे अशा सूचना दिल्या. दरम्यान, कासेगाव (ता.पंढरपूर) येथे अटल आनंद घन वन प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या रोपवनाची व रोपवाटिकेची पाहणी केली. यावेळी पाटील यांनी कासेगाव रोपवनामध्ये वृक्षारोपणही केले.
याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, उपवन संरक्षक धैर्यशिल पाटील, अतिरिक्त मुख्याधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार , सहा. जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जि.प. बांधकामचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नरळे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी चैताली वाघ यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.