मुंबई विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाबाबतची राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मंत्रालयात बैठक आयोजित करून नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात दिल्लीत होणाऱ्या प्रस्तावित राष्ट्रीय सेमिनारविषयी पूर्वतयारीचा आढावा घेतला. या बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने नवी दिल्ली आणि मुंबई विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाबाबत राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. तसेच, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही याप्रसंगी त्यांनी दिल्या.
पाटील पुढे म्हणाले की, राज्यात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विविध उपक्रम व नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत असताना अधिक स्पष्टता यावी आणि अधिक माहिती व्हावी, यासाठी नीती आयोगाकडे विभागाने कार्यगट निर्माण करून पाठपुरावा करावा. सध्या राज्यात २०० महाविद्यालयांमध्ये भारतीय ज्ञान प्रणाली (आयकेएस) सुरू असून त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातील नवीन शैक्षणिक धोरणाचे ब्रॅंडिंग होण्यासाठी मुंबईत परिषद आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध परिसंवादाचे आयोजन, विविध सत्रात राज्यातील शिक्षणाविषयाची माहिती, योजना, उपक्रम, विविध विद्यापीठात प्रशिक्षण, अभ्याससत्राच्या माहितीचे प्रदर्शन भरविण्यात यावे. जेणेकरून राज्यातील उच्च शिक्षण विभागाची सकारात्मक प्रतिमा देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत जाईल. इतर शासकीय आणि खाजगी नामांकित विद्यापिठांनी विविध विषयावर दिवसभर कार्यशाळा आयोजित करावी. यात देशभरातील किमान १० राज्यांतील विद्यापीठांना निमंत्रित करावे. या सर्व विषयांचे पुस्तक काढता येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नाविन्यपूर्ण व धोरणात्मक सुधारणांची माहिती देशभरातील विद्यार्थी, विद्यापीठ यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम आहे. यामुळे विभागाने वेबपोर्टल तत्काळ अपडेट करून त्यामध्ये बदल करावेत. राज्यभरातील विद्यापीठे, विविध प्रशिक्षणे, अभ्यासक्रम, योजना, उपक्रम, प्रयोग याची एकत्रित सारांश रूपातील माहिती विद्यापीठनिहाय घेता येईल. मराठीसोबत हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ भाषेतही सारांश तयार करावेत. जेणेकरून देशभरातील सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील विद्यापिठांशी जोडले जातील. शिवाय उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे एक्स हॅन्डल तयार करून यावरही माहितीपूर्ण मजकूर वेळोवेळी अपडेट करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.
बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा) संचालक निपुण विनायक, उपसचिव अशोक मांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू अजय भामरे, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर आदी प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्यासह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व सुकाणू समितीचे सदस्य अनिल राव दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.