स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या विचाराला साजेसे महाआरोग्य शिबिर आयोजित करून त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली याबाबत समाधान वाटते – चंद्रकांत पाटील
पुणे : स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त चिंचवडमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या अटल महाआरोग्य शिबिरास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित राहून पाटील यांनी गरजू रुग्णांना आरोग्य संबंधित साहित्य वाटप केले. लक्ष्मणभाऊंना जाऊन आज एक वर्ष झाले यावर विश्वास बसत नाही. आजही अनेक प्रसंगी त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. लक्ष्मण भाऊंनी आयुष्यभर गोरगरिबांची मदत केली. त्यामुळे त्यांच्या विचाराला साजेसे महाआरोग्य शिबिर आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करून त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली याबाबत समाधान वाटते, असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, कोविडमुळे आपल्याला सर्वांना आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ५० कोटी नागरिकांना आयुषमान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढविली आहे. एमएनजीएलने आरोग्य व्हॅन उपलब्ध करुन दिली आहे. या माध्यमातून खर्चिक आरोग्य तपासणी मोफत होत आहेत. या अनुषंगाने आगामी काळात तशीच गाडी पिंपरी चिंचवड साठी देखील उपलब्ध करून देऊ. या माध्यमातून पिंपरी चिंचवड आणि भोसरी मधील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रदेश अध्यक्ष महिला मोर्चा सौ. चित्राताई वाघ , आ. अश्विनीताई लक्ष्मण जगताप, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.