पुणे : केंद्र सरकारच्या विविध योजनांचा सर्वसामान्यांना लाभ घेता यावा, यासाठी नगरसेवक गणेश बिडकर यांनी विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेमुळे अनेक नागरिकांचे आयुषमान भारत, अन्न सुरक्षा आदी कार्ड काढून देण्यात आले. याचे वाटप शनिवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केले.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी गणेश बिडकर यांनी आपल्या भागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी “एक कॉल प्रॉब्लेम सॉलव्ह” उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन केले. भारतीय जनता पक्षाने एक महिना राजकारण आणि उर्वरित काळ समाजकारण अशी शिकवण दिली. त्यामुळे, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्ते अहोरात्र समाजसेवेसाठी कार्यरत आहेत. मोदीजींनी लहानपणी जे अनुभवले, त्यातूनच गरीब कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी समाजोपयोगी योजना राबविण्यात येत आहेत. हर घर नल से पाणी, उज्वला गॅस, जन-धन योजना, आयुषमान भारत, पंतप्रधान आवास योजना या त्यापैकीच आहेत. कोविड काळात भारतीय जनता पक्षाने ‘सेवा हेच संघटन’ मानून काम केले, हीच भावना मनात ठेवून सर्वांनी सेवाभाव जपावा, सेवेचे व्रत स्वीकारावे अशी भावना याप्रसंगी पाटील यांनी व्यक्त केली.
गरिबकल्याण हाच मुख्य अजेंडा घेऊन काम करणाऱ्या मोदी सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळत आहेत. पुण्यातही ही संख्या मोठी आहे. अशाच प्रातिनिधीक लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पक्षातील सर्व सहकारी पदाधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.