जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पोलीस प्रशासनाला अत्याधुनिक सुविधांसाठी अधिक निधी देण्यात यावा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

7
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकिस दूरदृश्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. सदर बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या ९४८ कोटी रुपये, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत १३५ कोटी आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ४५ कोटी ८४ लाख रुपये अशा एकूण एक हजार १२८ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र जास्त असल्याने या भागात आवश्यक सुविधांसाठी राज्यस्तरावरून निधी देण्यात यावा. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पोलीस प्रशासनाला अत्याधुनिक सुविधांसाठी अधिक निधी देण्यात यावा.
जिल्ह्यातील तीर्थस्थळे आणि पर्यटन विकासाच्या कामांना गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले, उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर, देहू, आळंदी, भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास करण्याचा प्रयत्न आहे. या कामांसाठी राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रस्ताव त्वरित सादर करावा असेही त्यांनी सांगितले.

यावेळी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी विविध विषय मांडले. पर्यटन विकास, तीर्थक्षेत्र विकास, पोलीस सुविधा, औद्योगिक क्षेत्रासाठी सुविधा, रस्ते विकास, ग्रामीण भागातील रस्ते, अंगणवाडी व शाळा खोल्यांची दुरूस्ती, नॉन प्लॅन रस्त्यांना राज्यस्तरावरून निधी, स्वस्त धान्य दुकानातील शिधावाटपात सर्व्हरमुळे येणाऱ्या अडचणी आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.