जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी नियोजन करावे, चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

15

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ च्या राज्यस्तरीय बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यात पुणे विभागाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून उपस्थित राहताना पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विषयासंदर्भात चर्चा केली.

सोलापूर जिल्ह्याचा सन 2024-25 चा प्रारूप आराखडा 589 कोटी असल्याचे नमूद करताना जिल्हाधिकारी यांनी 16 योजनेअंतर्गत 167 कोटींची वाढीव मागण सादरीकरणाद्वारे केली. दरम्यान, पंढरपूर विकास आराखड्याचा भाग म्हणून चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण प्रकल्प करण्याची अनुमती मिळावी. जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी नियोजन करावे, अशी सूचना पाटील यांनी केली.
 
अजित पवार म्हणाले, शासनाने निर्धारीत केलेल्या आर्थिक मर्यादेत वार्षिक आराखडा निश्चित करण्याची मर्यादा असल्याने राज्यस्तरीय योजनांमधून काही कामे घेण्यात यावीत. जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना राज्यस्तरावरून निधी देण्यात येईल. जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडा लवकर तयार करावा, असेही पवार म्हणाले.
 
या बैठकीस नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपसचिव नितीन खेडकर, नियोजन उपायुक्त संजय कोलगणे यांच्या सह सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.