पुणे : राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून डीसीसीआय उद्योगांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने तरुण उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष चर्चासत्रास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पाटील यांनी पुणे शहरातील नवउद्योजकांचा गौरव करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संशोधन क्षेत्राला विशेष प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे, नवउद्योजकांनी संशोधनावर अधिकाधिक भर देऊन विकास साधावा असे आवाहन पाटील यांनी केले. तसेच, युवकांनी देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
जगात नाविन्य, पेटंट आणि रॉयल्टी या तीन गोष्टींनी प्रगती साधता येणार असून त्यासाठी संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे. संशोधनाच्या माध्यमातून स्टार्टअप सूरू करण्यासाठी युवा उद्योजकांना शासनाचे सर्व सहकार्य राहील, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.
संशोधनाच्या माध्यमातून तरुणांनी स्वत: उद्योग उभे करून देशाला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा युवा उद्योजकांना प्रोत्साहन देऊन एकप्रकारे उद्योजक घडविण्याचे कार्य डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर ही संस्था करीत आहे अशा शब्दात पाटील यांनी संस्थेचे कौतुक केले.
ते पुढे म्हणाले, आज देशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती होत असून नव्या पिढीला उद्योगाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. या वातावरणाचा लाभ घेत कोणतेही संशोधन स्पर्धेपुरते मर्यादित न राहता त्या माध्यमातून बाजाराच्या गरजा कशा पूर्ण करता येतील, आर्थिक उन्नती साधता येईल याचा युवकांनी विचार करावा. या क्षेत्रातील विविध संधींचा लाभ घेत नवी कौशल्ये आत्मसात करावी. डेक्कन चेंबरने तरुण-तरुणींना असेच प्रोत्साहन देवून युवा उद्योजक घडवण्यासाठी यापुढेही कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संशोधन करण्यासाठी विषयाचे आकलन गरजेचे असते. त्यामुळेच देशात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी होत असून मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. व्यावहारिक ज्ञान व व्यवसायाभिमुख शिक्षणावरदेखील भर देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान चांगल्याप्रकारे होऊन त्यांची संशोधनाची वृत्ती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे संस्थापक संचालक आणि उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव, स्टार्टअप आणि नाविन्यता समितीच्या अध्यक्षा सुप्रिया बडवे, श्रीकांत बडवे, रिलायन्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष सुशील बोर्डे आदी उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.