उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

12
सोलापूर : उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी पार पडली. यात दि. ११ जानेवारी ते दि.११ फेब्रुवारी या कालावधीत उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी एक सिंचन आवर्तन देण्यात यावे, तसेच पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे अत्यंत सुक्ष्म नियेाजन करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.
गतवर्षी पाऊस कमी झाला असून, उपलब्ध पाणी येणाऱ्या पावसाळयापर्यत पुरविण्यासाठी सिंचन विभागाने नियोजन करावे असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी पिण्याचे पाणी पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना केली. यापूर्वी कालवा सल्लागार समितीने मंजूरी दिल्याप्रमाणे पाण्याच्या आवर्तनाचे नियेाजन संबधितांनी केले नसल्यास त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी करण्यात येईल असे सांगून, आवश्यकतेनुसार  आढावा घेऊन कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

उजनी प्रकल्पात सध्या ५.३४ टीएमसी (९.५८ टक्के) उपयुक्त पाणीसाठी आहे. उजनी भिमा प्रकल्पाद्वारे सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र २ लाख ५४ हजार २५३ हेक्टर (८४.५० टकके) होते अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, मोहोळचे आमदार यशवंत माने, करमाळाचे आमदार संजय शिंदे, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच.टी.धुमाळ, अधिक्षक अभियंता धीरज माळी यावेळी उपस्थित होते. तर माढयाचे आमदार बबनदादा शिंदे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाषबापू देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.कपोले  हे दृकश्राव्य माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.