पुणे : संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या तीन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी हजेरी लावली.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, “प्रभू श्रीराम केवळ देव नाहीत, तर व्रतस्थ व आदर्श जीवनाचे प्रतीक आहे. अखंड भारतातील हिंदूंचे परम श्रद्धापीठ आहे. राम मंदिर केवळ वास्तू नसून, श्रद्धास्थान आहे. प्रभू रामाच्या आदर्शावर तंतोतंत काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा दिवस व्रत केले असून, खऱ्या अर्थाने रामराज्य येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन पाटील यांनी याप्रसंगी केले.
टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या भव्य रामनगरीमध्ये अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिकृतीच्या साक्षीने होत असलेल्या या कार्यक्रमास आमदार भीमराव तापकीर, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, अभिनेता क्षितिज दाते, रमेश परदेशी संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, विनोद सातव, सुभाष नाणेकर, हेमंत रासने, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.