सरकार म्हणून राजाश्रय नक्कीच देऊ; पण त्यासोबतच नाट्य क्षेत्राच्या विकासासाठी लोकाश्रय देखील मिळाला पाहिजे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पाटील पुढे म्हणाले, मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी या देशातील रंगभूमी टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी रंगभूमी सर्वोत्तम असल्याने ती टिकविणं, जगविणं आपली जबाबदारी आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात नाटकाचा भाव पोहोचून रसिकांनी तिकीट काढून नाटक पाहावे आणि महाराष्ट्रात या माध्यमातून नाट्य रसिकांची संख्याही वाढावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यापीठातून युवा कलावंत निर्माण व्हावेत यासाठी शासनाकडून विद्यापीठाच्या कला विभागास अनुदान देण्यात येते. कला विभागाला ज्यादा चा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
सोलापूर येथे 100 व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलन पार पडण्यासाठी यशस्वीरित्या काम केल्याने पाटील यांनी कौतुक करून स्वतःच्या हातातील घड्याळ विजयदादा साळुंके यांना भेट दिले. यावेळी साळुंखे रंगमंचावरच भावूक झाले.
यावेळी शोभा बोल्ली यांच्या नटरंग या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सोलापूर येथील सर्व रंगकर्मी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतरचे नाट्यसंमेलन बीड येथे होणार असल्याने नटराजची मूर्ती आणि नाटकाची घंटा बीड शाखेकडे सुपूर्त करण्यात आली.