जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल असा विश्वास –  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

21

मुंबई : मंत्रालयात जर्मनी शिष्टमंडळातील फ्रॅंक झुलर, अंद्रेस रिस्किट या सदस्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. याप्रसंगी जर्मन शिष्टमंडळासमवेत बैठक आयोजित करून उच्च व तंत्र शिक्षण विभागा संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. यात जर्मनीला किमान ४ लाख कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मन येथे रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्या अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. तसेच, येत्या काळात जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ओमकार कलवाडे उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, याबाबत लवकरच महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलन करून, या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे शिक्षण हे अकृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यानंतर जर्मन कंपन्यांकडून मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाईल.
या निवडलेल्या विद्यार्थ्यांना जर्मन येथे जाण्याची व्यवस्था शासनाकडून केली जाईल. जर्मन येथे गेल्यानंतर त्यांचे किमान तीन महिन्याचे प्रशिक्षण होईल. मात्र यामध्ये काही विद्यार्थ्यांना अडचणी किंवा संबंधित कंपनीकडून नाकारले तर त्यांना किमान तीन महिन्यांचा भत्ता देणे अनिवार्य करावे, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी केल्या.

आजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग  तंत्रज्ञान वापरण्याचे युग आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून युवा पिढी एकापेक्षा अधिक कौशल्य विकास प्राप्त करू शकते. जर्मनी येथे संधी मिळालेले विद्यार्थी स्वतःच्या उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीने आपल्या देशाची, राज्याची वेगळी ओळख निर्माण करतील असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.