“वाय वेस्ट वायईडब्ल्यूएस” ऍप्लिकेशन आणि डॅशबोर्डचे डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन
पाटील म्हणाले, महाराष्ट्राचा वॉटर स्टुअर्डशीप कार्यक्रम तरुणांच्या सहभागातून आणि शाश्वत पद्धतींद्वारे पाणी टंचाई दूर करण्यासाठी तयार केला आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ७ लाख १० हजार तरुणांना सक्षम करणे, त्यांना साधने पुरवणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि एकत्रितपणे पाणी, पर्यावरण आणि शाश्वतता यावर काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. कृती आणि कल्पनांद्वारे, हे स्वयंसेवक राज्यातील २.७ दशलक्ष लोकांना प्रेरित आणि प्रभावित करतील ज्यातून लक्षणीय पाणी बचत होईल. आतापर्यंत या तरुणांनी जवळपास दोन लाख नागरिकांना या चळवळीशी जोडून घेतले आहे. चार महिन्यांतल्या या प्रयत्नांमुळे १ लाख ३२हजार ५५६ घनमीटर पाण्याची बचत झाली असून ते पाणी ५१ ऑलिम्पिक-आकाराच्या जलतरण तलावांच्या समतुल्य आहे. जलसंधारणाची मोठी चळवळ उभारण्याची ही सुरुवात आहे. महाराष्ट्रातील १ हजार ४०० ग्रीन क्लबमधील ४०हजार युवा स्वयंसेवकांचे जलसंवर्धनसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पाटील यांनी अभिनंदन करून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुणांना या चळवळीत सामील होण्याचे आवाहनही केले.
व्हाय वेस्ट वाइडब्ल्यूएस ॲपविषयी माहिती
उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, युनिसेफ महाराष्ट्र, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) इंडिया, ॲक्वाडॅम (ACWADAM) पुणे यांच्या सहकार्याने वाय वेस्ट वाईडब्ल्यूएस ॲप (यूथ एंगेजमेंट अॅण्ड वॉटर स्टीवर्डशीप) तयार केले आहे. त्यामध्ये ७ लाख १० हजार तरुणांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे.
तरुणांसाठी एक व्यासपीठ तयार करुन त्या माध्यामातून त्यांना जलसंधारणाची आवड निर्माण व्हावी हा यामागील प्रयत्न आहे. हे ॲप दैनंदिन पाणी-बचतीची नोंद ठेवण्यासाठी एक साधन असून पाणी गळती दुरुस्त करणे, नळाचा प्रवाह कमी करणे, शॉवर ऐवजी बादलीने पाणी वापरणे, दात घासताना किंवा दाढी करताना पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणे, ग्रामीण भागात शोषखड्डे व पाझरखड्डे बनविण्यास प्रवृत्त करणे, अशा छोट्या – छोट्या सवयींसाठी प्रोत्साहित करते.