मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक ओळख निर्माण केली – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, मुंबई विद्यापीठाने १६७ वर्षाचा गौरवशाली प्रवास केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवताना अनुभवला आहे आणि तीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा केली आहे. सामाजिक व औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित अनेक उपक्रमांची पायाभरणी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या ज्ञानशाखेला उत्कृष्ट मापदंड निश्चित करता आला आणि उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. जगभरात मुंबई विद्यापीठाने आपली ओळख निर्माण केली आहे.
मुंबई शहर सांस्कृतिक एकात्मता राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिबिंब आहे. येथील अथ:क कार्यसंस्कृती या शहराची वैशिष्ट्ये आहे. या संस्कृतीला आत्मसात केल्यानंतर जगाच्या पाठीवर कुठेही गेला आणि कितीही आव्हाने आली तरी ती आव्हाने यशस्वीपणे पूर्ण करण्याची ताकत या विद्यार्थ्यांकडे असेल.
नवीन शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय संशोधन अनिवार्य करून समाजाच्या आणि मानवतेच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे.यात कौशल्य विकास व रोजगार क्षमता आणि उद्योजकता वाढीला प्रोत्साहन दिले आहे. एका बाजूस ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य तर दुसरीकडे विकसित भारत संकल्पनेत सहभागी होऊन दर्जेदार शैक्षणिक संस्था,कुशल मनुष्यबळ उपलब्धता याकडे अधिक लक्ष दिले आहे. असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी,प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. प्रसाद करांडे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते