आरक्षण अधिनियम-२०२४ , अन्वये २६ फेब्रुवारी २०२४ पासून ‘सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग’ असा नवीन वर्ग निर्माण करण्यात आला असून, मराठा समाजाला आता १० टक्के आरक्षण

मुंबई : सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१६ नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम-२०२४, २६ फेब्रुवारी २०२४ पासून अंमलात आला आहे. या अधिनियमान्वये “सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग” असा नवीन वर्ग निर्माण करण्यात आला असून, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गासाठी यापुढे होणाऱ्या नोकर भरतीप्रक्रियेत आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये २६ फेब्रुवारी २०२४ पासून १० टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. यासाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सुधारीत बिंदुनामावली विहित करण्यात आली आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ संदर्भात राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट (Caveat) दाखल करण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत महायुती सरकारने आपली वचनपूर्ती केली असल्याचे पाटील यांनी म्हटले. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल, महायुती सरकारचे पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत तसेच या निर्णयाला एकमुखी पाठिंबा देणा-या सर्व सहकारी सदस्यांना देखील मनःपूर्वक धन्यवाद दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!