मुंबई : प्राचीन, समृद्ध आणि वैभवशाली पारसी-झोराष्ट्रीयन संस्कृतीच्या अध्ययन आणि संशोधनासाठी या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठात अवेस्ता पहलवी अभ्यासकेंद्र सुरू होणार आहे. या अभ्यास केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन केंद्रीय महिला व बाल विकास आणि अल्पसंख्यांक कार्यमंत्री स्मृती इराणी तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात झाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाषा समाजाचा मूळ पाया असून भाषेबरोबरच शिक्षण समाजात स्थिरता आणि सन्मानाचा मार्ग दाखवते. यासाठी संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी त्या संस्कृतीतील भाषांचे जतन आणि संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. अवेस्ता – पहलवी भाषेचा संस्कृत भाषेशी जवळचा संबंध असून मुंबई विद्यापीठाने अवेस्ता-पहलवी या झोरोस्त्रियन लोकांच्या प्राचीन आणि पवित्र भाषा अभ्यासण्याचा सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. या अभ्यास केंद्राला राज्य शासनाच्यावतीने आवश्यक मदत केली जाईल. एका वर्षात या केंद्राची देखणी इमारत पूर्ण करण्यात येईल, तो पर्यंत हे अभ्यास केंद्र अन्य ठिकाणी सुरू करावे, असे ते म्हणाले.
पाटील म्हणाले, भाषा या सामाजिक-सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटनांच्या प्राथमिक वाहक असून भारत सरकारने संस्कृत, पाली आणि पर्शियन या सारख्या प्राचीन भारतीय भाषांमधील उपलब्ध साहित्याचा शोध घेण्यावर भर दिला आहे.
याप्रसंगी उदवाडाचे प्रधान पुजारी वडा दस्तूरजी खुर्शेद दस्तूर, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नादिर बुर्जोरजी गोदरेज, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव जितेंद्र सिंह राजे यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड तसेच मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसह मान्यवरही उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.