तरुणांना वर्गखोल्यातून बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना थेट समाज प्रवाहाशी जोडून घेणे गरजेचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांना जोडून ‘इंटर्नशिप’ हा उपक्रम सुरू करण्यात येत असून, शासकीय विभागांमध्ये विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हास्तरावर इंटर्नशिप करता येईल. यासाठी ‘सेंटर फॉर रिसर्च इन स्किम अँड पॉलिसीज’ (CRISP) आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल (NSDC) या दोन संस्थांसोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नवनवीन कौशल्ये आणि भारतीय मूल्ये, पाठांतर करण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाने शिक्षण घेतले तर माणूस समृद्ध होतो. तरुणांना वर्गखोल्यातून बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना थेट समाज प्रवाहाशी जोडून घेणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज भारत ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने पुढे जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला भारत साकार करायचा आहे. हा विकास घडवून आणायचा असेल तर उच्च शिक्षणात व्यापक आणि आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील. त्या दृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या NEP अंमलबजावणीने महाराष्ट्रात वेग धरला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ गाभा हा विद्यार्थ्यांचा ‘सर्वांगीण विकास’ आहे. त्यासाठी दोन महत्त्वाचे मूलाधार आहेत. तरुणांना वर्गखोल्यातून बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना थेट समाज प्रवाहाशी जोडून घेण्यासाठी. गत वर्षी स्वायत्त महाविद्यालयांमध्ये एनईपी (NEP) चे प्रयोग केले. अनुभव घेतला. सुसूत्रता आणली. पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्वच विद्यापीठांनी संलग्न महाविद्यालयांमधून NEP लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विद्यार्थी संख्या खूप मोठी आहे.
या सर्व विद्याथ्यार्थ्यांना इंटर्नशिप द्यायची असेल तर एक मोठी चळवळ उभी करावी लागेल. स्थानिक उद्योग, छोटे मोठे व्यवसाय, सेवाभावी संस्था, कलाकार, हस्त कलाकार, अगदी सीए, वास्तुविशारद, वकील, व्यावसायिक या सर्वांनाच या चळवळीत सामील करून घ्यावे लागेल.
यासाठी आम्ही नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व सरकारी विभागांमध्ये इंटर्नशिप देण्याचा निर्णय घेतला. पॉलिसी तयार करून शासन निर्णय काढला. आता विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हास्तरातील सरकारी विभागांमध्ये इंटर्नशिप करता येईल.
सिंहगड या शासकीय निवासस्थानी झालेल्या सामंजस्य कराराच्या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी ,सेंटर फॉर रिसर्च इन स्किम अँड पॉलिसीज चे (CRISP) आर. सुब्रह्मण्यम, माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे, टीमलीज एडटेकचे संस्थापक आणि सीईओ शंतनू रूज, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिलचे जयदीप केवल रमाणी, मार्केटिंग हेड, कविता रुज, नॅशनल हेड अंशुल गुप्ता, रीजनल हेड स्वाती चक्रवती, सीनियर मॅनेजर राहुल पुरी यावेळी उपस्थित होते.