मुंबई : राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबातील माता-भगिनींच्या सन्मानासाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे. या अभिनव योजनेमुळे राज्यातील २४ लाख ८० हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगिनींना साड्यांचा लाभ मिळाला आहे. याबाबत माहिती वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या कापसाला मागणी वाढून सूतगिरणींच्या सुताला भाव आणि स्थानिक यंत्रमागधारकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. दिनांक ११ मार्च २०२४ पर्यंत महामंडळाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तालुका स्तरावरील गोडाऊनपर्यंत सर्व साड्यांचा १०० टक्के पुरवठा पूर्ण केला आहे.
काही दुकानांत खराब, फाटलेल्या साड्या मिळाल्याबाबत तक्रारी आहेत. तथापि आतापर्यंत निदर्शनास आलेल्या खराब झालेल्या साड्या मोजक्याच ठिकाणी असून, पुरवठा झालेल्या एकूण साड्यांच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात आहेत. तरीही संबंधित ठिकाणी महामंडळाने आपले अधिकारी पाठवून त्वरेने साडी बदलून देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकारी पाठवून साडीचा दर्जा, पुरवठा आणि वितरणाबाबत तपासणी अहवाल मागवला आहे. सदर अहवालानुसार जर काही साड्या निर्मितीदोष अथवा फाटलेल्या आढळल्यास त्या त्वरित बदलून देण्याची व्यवस्था महामंडळाने अगोदरच कार्यान्वित केलेली आहे. याबाबत काही तक्रारी असतील तर info@mspc.org.in ई-मेलवर तक्रार करावी किंवा 022-27703612 नंबरवर (सकाळी 9.45 ते सायं. 6.15) या वेळेत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Get real time updates directly on you device, subscribe now.