नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धवट काँग्रेसमध्ये विकासाची ताकद नाही!, नांदेड येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हल्लाबोल

22

एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि दोघांनी मिळून अर्धी केलेली उरलीसुरली काँग्रेस यांची तीनचाकी ऑटोरिक्षा महाराष्ट्राचा विकास करू शकणार नाही, इंजिन एकाचे, चाके एकाची, आणि सुटे भाग तिसऱ्याचे अशी ही रिक्षा निवडणुकीच्या निकालानंतर आणखीनच मोडीत निघणार असून एकमेकांशी संघर्ष करणार आहे, तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी देशाला विकास आणि समृद्धीच्या दिशेने नेणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर बसविण्याचा निर्धार करा, असे आवाहन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नांदेड येथे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराचा जोरदार प्रारंभ केला.

आगामी लोकसभा निवडणूक ही केवळ प्रतापराव पाटील यांना विजयी करण्याची निवडणूक नाही, तर समृद्ध भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविणारी निवडणूक आहे. मोदी यांनी दहा वर्षांत देश समृद्ध केला. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारच्या काळात अकराव्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर बसल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणार, ही मोदी यांची गॅरंटी आहे, असेही अमित शाह म्हणाले.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, आणि देशाचा प्रत्येक नागरिक काश्मीर करिता संघर्ष करण्यासाठी सज्ज आहे. गेली 70 वर्षे कलम 370 ला अनौरस पुत्राप्रमाणे कवटाळून बसलेल्या काँग्रेसला मात्र, हे कलम रद्द झाल्यावर पोटदुखी सुरू झाली. कलम 370 रद्द होणे गरजेचे होते, आणि नरेंद्र मोदी यांनी ते काम करून काश्मीरला खऱ्या अर्थाने देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले. भारताची सेना आणि देशाची सीमा यांच्याबाबत छेडखानी करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल असा संदेश मोदींनी पाकिस्तानला आणि जगाला दिला आहे. नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले, असेही श्री.शाह यांनी नमूद केले. काँग्रेसने राम मंदिरात अडथळे आणले, तर मोदी यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण केले. पाचशे वर्षांनंतर प्रथमच रामनवमीला प्रभू श्रीराम आपला वाढदिवस भव्य मंदिरात साजरा करणार आहे. काँग्रेसला वोटबँकेची भीती आहे, म्हणून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या निमंत्रणाकडेही त्यांनी पाठ फिरविली, जे या सोहळ्यास उपस्थित राहू इच्छित होते, त्यांनाही पक्षातून काढून टाकले. काँग्रेसने देशाच्या संस्कृतीचा अपमान केला, तर देशाच्या अस्मितांना सन्मान देण्याचे काम मोदींनी केले, असे ते म्हणाले.

आपल्या तडाखेबंद भाषणात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्ला चढविला. शरद पवार केंद्रात दहा वर्षे मंत्री होते, पण त्यांनी महाराष्ट्राला काय दिले, असा सवाल करताना, मोदी सरकारने महाराष्ट्रासाठी केलेल्या कामांची यादीच अमित शाह यांनी सादर केली. काँग्रेस सरकारने दहा वर्षांत 1 लाख 91 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले, तर मोदी सरकारने 7 लाख 15 हजार कोटी रुपये दिले. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 3 लाख 90 हजार कोटी, राष्ट्रीय महामार्गासाठी 75 हजार कोटी, 2 लाख 20 हजार कोटी रेल्वेसाठी, चार हजार कोटी विमानतळ उभारणीसाठी, तर एक लाख कोटी रुपये स्पेशल इन्फ्रा प्रोजेक्टसाठी नरेंद्र मोदींनी दिले. ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही. मोदी, शिंदे, फडणवीस हेच महाराष्ट्राचा विकास करू शकतील. अन्य कोणीही करू शकत नाही. गरीब कल्याणाच्या असंख्य योजना मोदी सरकारने अंमलात आणल्या. महाराष्ट्रातील राज्यातील 1.16 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, 1.20 कोटी घरांत नल से जल, एक कोटी लाभार्थींना पाच लाखांपर्यंतचा आयुष्मान योजनेचा लाभ, 70 लाखांहून अधिक शौचालये, 7 कोटी नागरिकांनी दरमहा मोफत धान्य, शिक्षणाच्या आधुनिक सुविधा मोदी सरकारने दिल्या. एवढी वर्षे नेतागिरी करणाऱ्या शरद पवारांनी राज्याला काय दिले असा सवाल ही त्यांनी केला. महिला, युवक, गरीब, वंचित, सर्वांच्या विकासाचा मोदींचा संकल्प आहे, असे ते म्हणाले.

आपल्या भाषणात अमित शाह यांनी नांदेड आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या अनेक योजनांचा उल्लेख केला. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, छत्रपती संभाजीनगर नामांतरास शरद पवार विरोध करत होते असा आरोप त्यांनी केला. भाजपा सरकारने नामांतर केले, पण उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते. आपण सारेजण मिळून एक असा भारत निर्माण करू, ज्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. संपूर्ण जगात देशाची प्रतिष्ठा असेल, असा भारत निर्माण करू, असे आवाहनही त्यांनी भाषणाच्या अखेरीस केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची जोरदार खिल्ली उडविली. ही आघाडी म्हणजे एकमेकांना विरुद्ध दिशांना ओढणारी अनेक इंजिने आहेत, पण त्यांच्या गाडीला जनतेसाठी डबेच नाहीत. एकमेकांना विरुद्ध दिशांनी खेचणारी इंजिने जागेवरून हलू शकत नसल्याने विकासाच्या मार्गावर तर जाऊच शकत नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

नांदेडचे  महायुती चे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर, खा.डॉ.अजित गोपछडे, सूर्यकांता पाटील, आदी नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.