‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ प्रकरणी उपाययोजना करण्याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी घेतली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट !
मोहोळ यांनी यांदर्भात म्हटले कि, पुणे हे विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या संस्कृतीला धक्का लागणारे प्रकार घडले आहे. त्यात नाईट-लाईफ कारणीभूत असल्याचे समोर येत आहेत. यामुळे तरुण-तरुणी व्यसनाच्या अधीन होताना दिसत आहेत. यातूनच अशा दुर्दैवी घटनांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना कराव्यात, या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली.
मोहोळ यांनी दिलेल्या निवेदनातील काही महत्वाचे मुद्दे : –
१) पुण्यात सुरु असलेली नाईट-लाईफ संस्कृती थोपविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब, बार यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
२) पबमध्ये सुरु असणाऱ्या पार्ट्यांसाठी डीजेवर लावण्यात येणारी गाणी ही अतिशय अश्लील पद्धतीची असतात. त्यामुळे त्यावर लगाम घातला पाहिजे.
३) मध्यरात्री शहरातील अनेक चौकाचौकात तरुण-तरुणी गर्दी करुन हुल्लडबाजी करत असतात. त्यावर चाप बसविण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे.
४) कोरेगाव पार्क ते विमाननगर, मुंढवा यांसह पुणे शहराच्या आसपासच्या अनेक परिसरातील पब हे रात्री ८ वाजेनंतर सुरू होतात. त्यानंतर अनेक तरुण-तरुणी पार्ट्यांच्या नावाखाली हुल्लडबाजी करत असतात. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पब चालकांना वेळेचे बंधन घालावे.
५) रात्री बेदरकारपणे गाडी चालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
६) कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीवर जामीनपात्र कलमे लावून, त्याला एकप्रकारे अभय दिले असल्याची भावना पुणेकरांमधून व्यक्त होत आहे. सदर घटना अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे आरोपीप्रती कोणतीही दया दाखवणे, योग्य नाही. यातून पोलिसांच्या प्रतिमेला ही धक्का लागत आहे. त्यामुळे आरोपीवर लावण्यात आलेल्या कलमांचा पुनर्विचार करुन, त्यास कठोर शासन व्हावे. जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत.
7) पुण्यात सुरु असलेल्या नाईट लाईफमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा विचार देखील आवश्यक आहे. कारण नाईट लाईफ मध्ये सहभागी तरुण तरुणी नशेच्या अमलाखाली गेल्याने; त्यांना कसलेही भान राहत नाही. त्यामुळे अनेकवेळा हे तरुण-तरुणी रस्त्यावरच अश्लील चाळे करताना, नाचताना, धिंगाणा घालताना व वेड्यावाकड्या गाड्या चालवताना दिसतात. अनेक वेळा या तरुणी उशिरा रात्री ‘पार्टी’ संपवून घरी परतण्यासाठी एकट्याच रिक्षा अथवा कॅबची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असतात. या सर्व प्रकारांमुळे या तरुणतरुणींच्या जिवाबरोबरच इतर सामान्य नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत असून या प्रकारांमुळे नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने कडक पावले उचलली पाहिजेत.
८) पब व बारमालक हॉटेल परवाना मिळवताना महापालिकेत प्रस्ताव दाखल करतेवेळी अतिशय छोटे बांधकाम दाखवतात. प्रत्यक्षात परवाना मिळाल्यानंतर अनधिकृतपणे पक्के बांधकाम करून अथवा शेड टाकून पब व हॉटेलचे आकारमान वाढवले जाते. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
९) शहरातील अनेक भागात पानटपऱ्या, आईस्क्रीम पार्लर व चायनीज गाडे दिवसभरानंतर रात्रीही जोमात सुरू असतात. काही टपरीचालक वेळेत बंद करतात, मात्र कहीजण रात्री चक्क बारा वाजेपर्यंत आपले दुकान थाटून बसतात. त्यामुळे याकडे पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष दिले पाहिजे, असे वाटते.
यावेळी मोहोळ यांच्यासमवेत अजय भोसले, योगेश टिळेकर, गणेश बीडकर, लतीफ शेख, डॅा. सिद्धार्थ धेंडे, प्रदीप देशमुख, रुपाली पाटील-ठोंबरे, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, हर्षदा फरांदे, संदीप खर्डेकर, दीपक पोटे, सुशील मेंगडे, राजेश येनपुरे, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.