मावळला मिळणार केंद्रात मंत्रिपद, खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावावर आज होणार शिक्केमार्तब ?
पिंपरी -: अनेकदा संसदरत्न पुरस्कार प्राप्त करणारे मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाची ‘हॅटट्रिक’ केलेले खासदार श्रीरंग बारणे यांचे केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान निश्चित असल्याची चर्चा जोर धरत आहे.
लोकसभा निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर काल एनडीएच्या बैठकीत नेते पदी नरेंद्र मोदी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या आठ जूनला होणार असल्याचे निश्चित झाले असल्याने मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात नक्की कोणाकोणाला संधी मिळणार याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे एकूण सात खासदार निवडून आले आहेत त्यामुळे दिल्ली दरबारी शिंदे यांचे वाढलेले राजकीय वजन पाहता शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपद व एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिवसेनेचे दिल्लीचे शिलेदार म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची आज (गुरुवारी) मुंबईत वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे.
शिवसेनेच्या खासदारांमध्ये ज्येष्ठता व अनुभव पाहता बुलढाण्याचे प्रताप जाधव यांच्या नंतर दुसरा क्रमांक श्रीरंग बारणे यांचा लागतो. गेली दहा वर्षे संसदीय कामकाजाचा अनुभव असणाऱ्या बारणे यांना संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे व चर्चांमध्ये सहभागी होणारे खासदार म्हणून संसद रत्न, संसद महारत्न आशा पुरस्कार अशा पुरस्कारांनी देखील वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. या सोबतच शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते म्हणूनही देण्यात आलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. लोकसभेचे पीठासन अधिकारी पदावर बसण्याचा बहुमान देखील त्यांना मिळाला आहे.
श्रीरंग बारणे हे मितभाषी स्वभावाचे आहेत. दिल्लीत देखील सर्वपक्षीय खासदारांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. बारणे यांचा अनुभव आणि प्रशासनावरील पकड या त्यांच्या जमेच्या बाजू पाहता शिंदे मावळच्या या शिलेदाराला नक्कीच दिल्लीला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देतील यात शंका नाही.
यासोबतच बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा निवडून येत त्यांनी गड राखला आहे तर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा भरगोस मताधिक्याने निवडून आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील युवा खासदार हातकणंगलेचे धैर्यशील माने हे दुसऱ्यांदा निवडून आले आहे असून त्यांना देखील राज्यमंत्री पदाची संधी मिळेल अशी चर्चा आहे.
सर्वबाबींचा विचार करता मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात संधी निश्चित मिळेल असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत.