जम्मूत यात्रेकरूंच्या बसवर भीषण दहशतवादी हल्ला… हल्ल्यात १० जण ठार तर ३३ जण जखमी
जम्मू : जम्मूमध्ये शिवखोरी येथे दर्शन घेऊन परत येणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर रविवारी भीषण हल्ला करण्यात आला आहे. जम्मू- काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये हा भीषण हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने स्वीकारली असल्याची माहिती समोर आली आहे.
बसवा झालेल्या या हल्ल्यात १० लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर ३३ जण जखमी आहेत. जंगलात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचनाक समोर येऊन गोळीबार सुरु केला. यामध्ये बसच्या ड्रायव्हरला गोळी लागली. ड्रायव्हरला गोळी लागल्यामुळे त्याचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली.
या हल्ल्यानंतर या भागातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला या घटनेचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी द रेसिस्टंन्स फ्रंट ने स्वीकारली आहे. याला पाकिस्तानचे समर्थन असल्याचे म्हटले जाते. या हल्ल्याचे तपासकार्य आता वेगाने सुरु करण्यात आले असून फॉरेन्सिक सायन्स लॅबचे तज्ज्ञ या तपासकार्यात सहभागी झाले आहेत.