जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा आहे अशी माझी धारणा आहे, त्यामुळे या सेवेसाठी मी सदैव तत्पर असल्याची चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

25

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मधील जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कोथरूडकरांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणल्या. या दरबाराच्या माध्यमातून त्यांनी कोथरूड मधील नागरिकांशी संवाद साधला.‌ यावेळी अनेकांनी आपली दाखल्याची तसेच प्रलंबित कामे झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा आहे अशी माझी धारणा आहे. त्यामुळे या सेवेसाठी मी सदैव तत्पर असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली.

कोथरुडमधील जनतेची सेवा करणे मी माझे परम कर्तव्य समजतो असे पाटील म्हणाले. या कर्तव्याचे पालन करत आजवर कोथरूडकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. कोथरूडकरांचे जीवनस्तर उंचावण्यासाठी आणखी काय करता येईल याबाबत विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जनता दरबार आयोजित केला. पाटील यांनी या दरबारातील महत्वपूर्ण गोष्ट सांगितली.

पाटील म्हणाले दरबारातील ८२ वर्षांच्या सुनंदा दाबके नावाच्या आजी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या. कारण, त्यांच्या चेहऱ्यावर कसलीही चिंता नव्हती, किंवा त्यांना माझ्याकडुन काही हवे आहे असेही भासत नव्हते. उलट त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती. जेव्हा आजींची भेट झाली, तेव्हा मलाही सुखद धक्का बसला. कारण, या आजींच्या समाधानाचे कारण मला उमगले होते. या आजींनी भेटुन एकाच वाक्यात आपले मत मांडले. त्या म्हणाल्य की, “तुमचं फिरतं पुस्तक घर हे माझ्या एकांताचा सोबती आहे.” त्यांचे हे एकच वाक्य माझ्यासह जनता दरबारात उपस्थित सर्वांनाच स्तब्ध करणारे होते. कारण, पुस्तक हा आपला खरा मित्र आहे, असे नेहमी सांगितले जाते. पण ते प्रत्यक्षात अनुभवणारी व्यक्ती समोर आली की अप्रूप वाटतं, असे पाटील म्हणाले.

कोथरुड मतदारसंघातून निवडून आल्यापासून फिरते पुस्तक घर असो, फिरता दवाखाना असो, गरजू मुलांना शैक्षणिक मदत असो, किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना वैद्यकीय मदत, असे एक ना अनेक उपक्रम आज कोथरुड मधील अनेकांना आधार ठरत आहेत. अन् राबविलेल्या उपक्रमाबाबत खूष होऊन सुनंदा दाबके यांच्या सारख्या आजीकडून मिळालेली समाधानाची आणि कौतुकाची थाप, ही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.