सन 2023-24 अन्वये उपलब्ध करून दिलेल्या निधीतून प्रत्येक विभागाने केलेल्या चांगल्या दहा कामांची यादी तयार करून ठेवावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

48

सोलापूर : सोलापूर निवेदन समितीच्या सभागृहात सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाणीटंचाई आणि इतर नागरी समस्यांबाबत बैठकीत चर्चा झाली.जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अन्वये उपलब्ध करून दिलेल्या निधीतून प्रत्येक विभागाने केलेल्या चांगल्या दहा कामांची यादी तयार करून ठेवावी. या सर्व कामांना आपण प्रत्यक्ष भेट देऊन मंजुरीप्रमाणे कामे पूर्ण झाली आहेत का पाहून कामांचा दर्जाही तपासू, असे या वेळी पाटील यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले. यावेळी 74 कोटी 35 लाख 38 हजारांच्या टंचाई कृती आराखड्यास मान्यताही देण्यात आली. सोलापूर महापालिकेने दुहेरी पाइपलाइनचे उर्वरित 20 टक्के काम नोव्हेंबर 2024 अखेर पूर्ण करून सोलापूर शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावेत. पाणी वितरण व्यवस्था तसेच नगर उत्थान अंतर्गत घेण्यात आलेल्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून सोलापूर महापालिका व वीज वितरण कंपनीने परस्परांत योग्य समन्वय ठेवून पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक वीजपुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.

शिक्षण विभागाने प्राथमिक शाळा दुरुस्तीवर अधिक खर्च करून सर्व शाळा व्यवस्थित कराव्यात. तसेच सर्व नगरपालिकांना देण्यात आलेला निधी मंजूर कामांवर व्यवस्थित खर्च होतो आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिकांनी प्रत्येक आठवड्याला ऑनलाइन बैठक घ्यावी, असे निर्देश देखील पाटील यांनी दिले. तसेच, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय अद्ययावत करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल. त्यासाठी तंत्रनिकेतनने प्रस्ताव तयार करून पाठवावा. तसेच तंत्रनिकेतनचे रुपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यासाठी आवश्यक प्रस्तावही शासनाला सादर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.
या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी-महसूल अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी आदींसह सर्व संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.