रेशीम उद्योगाच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन रेशीम उद्योगातून आपला विकास करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील हिरजमध्ये कार्यान्वित होत असलेले महाराष्ट्रातील पहिले रेशीम खरेदी-विक्री तथा प्रक्रीया केंद्राचे उद्घाटन आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कमी पाण्यावर चांगला पैसा मिळवून देणारे व वर्षभर उत्पादन घेता येणारे पीक म्हणजे तुती. त्यामुळे सोलापूरसह आसपासच्या भागात तुतीची लागवड वाढत आहे. रेशीम उद्योगाच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. शेतकऱ्यांनीही त्याचा लाभ घेऊन, रेशीम उद्योगातून आपला विकास करावा, असे आवाहन याप्रसंगी पाटील यांनी केले.
तसेच हिरज येथील रेशीम बाजारपेठेमुळे सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील अन्य जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली असून याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळणार आहे. शासन ही महारेशीम अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तुती लागवडी बाबत जागृती करत आहे. जिल्ह्यासह राज्यातील सर्व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या अनुषंगाने प्रलंबित असलेले प्रस्ताव शासन स्तरावरून त्वरित निकाली काढण्याचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. शासन खंबीरपणे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.