क्रीडा संकुल अंतर्गत कामासाठी १५ कोटी ६९ लाखांचा निधी मंजूर… तालुका क्रिडा संकुलाची कामे ही वेळेत पूर्ण करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सोलापूर : नियोजन भवन येथील सभागृहात जिल्हासतरीय क्रीडा संकुल समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत विविध कामे करण्यासाठी 15 कोटी 69 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. क्रीडा विभागाने संबंधित खेळाडूंना चांगल्या सुविधा वेळेत मिळण्यासाठी संबंधित कामे अधिक गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले.
पाटील म्हणाले की, कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक, खेळाडूंसाठी हॉस्टेल, बॅडमिंटन हॉलची दुरुस्ती आणि अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आदी सर्व कामे मंजूर निधीतून पूर्ण करावी. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी दक्षता घ्यावी. क्रीडा संकुलात सर्व खेळाडू खेळाशी संबंधित संस्था व नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पाहिजेत. यासाठी आवश्यक असलेला निधीची तरतूद करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका स्तरपर्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी क्रीडा विभागाने तालुका स्तरावरील क्रीडा संकुलांची कामे अधिक गतीने मार्गी लावावीत. शासनाने तालुकास्तरावरील चांगली क्रीडा संकुले उभे राहावीत यासाठी निधी मंजूर केलेला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या सुविधा निर्माण झाल्यास ते राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्वल करतील असे त्यांनी सांगितले. विहित पद्धतीने खेळाशी संबंधित संस्थांना शासकीय मैदाने उपलब्ध करून द्यावीत. अन्य कोणत्याही खाजगी कारणासाठी मैदाने उपलब्ध करू नयेत असेही त्यांनी सुचित केले. महापालिकेकडे असलेला क्रीडा विभागाचा जलतरण तलाव हस्तांतरित करण्याबाबत महापालिका आयुक्त आल्यानंतर चर्चा करून निर्णय घ्यावा. तसेच क्रीडा संकुल अंतर्गत रिक्त असलेले शासकीय गाळे विहित नियमावलीचा वापर करून भाड्याने द्यावीत, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका व जिल्हा स्तरावरील क्रीडा संकुलामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून मिळण्याबाबत क्रीडा विभागाने अधिक सक्षमपणे काम करावे असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार सुभाष देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या सर्व संबंधित सदस्य उपस्थित होते.