बाणेर- पाषाण लिंकरोडचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन पूर्ण करा – चंद्रकांत पाटील
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज सोमेश्वरवाडी येथील आयवरी इस्टेट रोड, बाणेर कळमकर नाल्यावरील एसटीपी प्लांट, बालेवाडी हाय स्ट्रीट आणि वाकड पूल जोड रस्ता आदी भागात महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर हायस्ट्रीट वरील नाल्यावर एसटीपी आदी कामांची पाहणी करून आढावा घेतला. दरम्यान पुणे महानरपालिकेने बाणेर- पाषाण येथील ३६ मीटर लिंकरोडचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. तसेच, नागरी समस्या तातडीने मार्गस्थ करण्याच्या सूचना देखील संबंधितांना दिले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आयवरी इस्टेट- सोमेश्वरवाडी रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून याठिकाणी पदपथ, पथदिवे आदी कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच पुढील टप्प्याच्या कामाची भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावीत. बाणेर येथील ३६ मीटर लिंकरोडचे काम लांबल्याने स्थानिक लोकांची गैरसोय होत आहे. महानगरपालिकेने स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन लवकर लिंकरोडचे काम सुरू करावे. रस्त्यासाठी जागेचे अधिग्रहण, गृहनिर्माण संस्थांची संरक्षक भिंत मागे घेणे इत्यादी कामे तातडीने करावी. अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. निधीची आवश्यकता भासल्यास प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना दिल्या.
यावेळी पुणे महानरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त महेश पाटील, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अमर शिंदे, परिमंडळ क्रमांक २ चे उपआयुक्त गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.