सावित्रीच्या लेकींसाठी उच्चशिक्षणाचा मार्ग खुला! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील विद्यार्थिनींसाठी मोफत उच्चशिक्षणाची घोषणा आज राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पादरम्यान विधानसभेत करण्यात आली. या निमित्ताने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना मोफत उच्चशिक्षण, या मी दिलेल्या वचनाची पूर्तता झाल्यामुळे मनाला लाभलेले समाधान अवर्णनीय असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व्यक्त केले. लोकसभा निवडणूक तसेच पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे सबंधित निर्णय घेण्यास काहीसा विलंब झाला असल्याचेही ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी हा निर्णय घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविल्याबद्दल महायुती सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले.
चंद्रकांत पाटील याबाबत म्हणाले कि, महिलांच्या प्रगतीमुळेच देशाची प्रगती होत असून ही प्रगती साधण्यासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. म्हणूनच देशातील मुलींचा शिक्षण क्षेत्रातील आकडा वाढता असावा, त्यांनी प्रगती करावी यासाठी “बेटी बचाओ बेटी पढाओ” सारखा कार्यक्रम मोदी सरकारने संपूर्ण देशभरात यशस्वी केला आहे. राज्यातील प्रत्येक मुलगी शिकायला हवी, असा माझा नेहमीच आग्रह असतो. त्यामुळे राज्यातील विद्यार्थिनींना मोफत उच्चशिक्षण देताना कला-विज्ञान-वाणिज्य शाखांबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्चशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींच्या १०० टक्के शुल्काचा परतावाही राज्य सरकार करणार आहे. राज्यातील २० लाखांहून अधिक विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे.
या शासन निर्णयाच्या निमित्ताने जिजाऊ, सावित्री,अहिल्यांच्या लेकींना हेच सांगू इच्छितो की, तुम्ही खूप शिका, कारण महाराष्ट्र शासन आणि शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग तुमच्या पाठीशी आहे, असे पाटील म्हणाले.