ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन… चंद्रकांत पाटील यांनी घेतले पालखीचे दर्शन
पुणे : टाळ – मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी पुण्यनगरीत आगमन झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करून मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिंडीत सहभागी होऊन वारकरी बांधवांशी संवाद साधला. तसेच टाळाच्या साथीने विठू नामाचा गजर करत वारकऱ्यांसमवेत फुगडीचा फेरही धरला. माऊलींच्या दर्शनाने मनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान प्रसाद सेवेच्या माध्यमातून माऊलींची सेवा करण्याचे भाग्य देखील पाटील यांना लाभले.
प्रारंभी शंखध्वनीने दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. हाती भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर असलेले तुळशी वृंदावन, कपाळाला टिळा, टाळ, मृदंग, वीणा वादनात, ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोषात, अभंग गायन, फुगडी, नर्तनात दंग वारकरी अशा भक्तीपूर्ण वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.