चंद्रकांत पाटील यांनी टी-20 विश्वचषक मिळवून अवघ्या देशाला अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण देण्याऱ्या भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांचे केले अभिनंदन
मुंबई : विधानभवन येथे टी-20 विश्वचषक विजेता ठरलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचा सत्कार सोहळा अतिशय दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून टी-20 विश्वचषक मिळवून अवघ्या देशाला अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण देण्याऱ्या भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांचे अभिनंदन केले.
टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मासह, त्याचे सहकारी सुर्यकूमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम् दुबे, प्रशिक्षक पारस म्हाब्रे, संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला. खचाखच भरलेले हे मध्यवर्ती सभागृह क्रिकेटच्या जल्लोषाने दणाणून गेले. भारतीय राष्ट्रध्वज उंचावून सभागृहात भारत माता की जय आणि वंदे मातरम् च्या घोषणाही घुमल्या. ‘…हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला या क्रिकेटमधीलच विक्रमादित्य लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या आवाजातील गाण्याने आणि हिंदी चित्रपट “चक दे इंडिया..!’ च्या जल्लोषी सुरांनी सभागृह सुरुवातीपासूनच निनादून गेले. यातच टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांचं आगमन होताच सभागृहातील घोषणा आणखी टिपेला पोहोचल्या.
या विशेष समारंभास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार- आशिष शेलार, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य, क्रीडाप्रेमी आदी उपस्थित होते.