मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

11

सोलापूर : आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्हा दौऱ्यादरम्यान नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीस हजेरी लावली.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. शासनाने या योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी यात अत्यंत सुटसुटीतपणा आणलेला आहे. तरी सोलापूर जिल्ह्यात या योजनेची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर करून 21 ते 65 वयोगटातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात जिल्हा राज्यात अग्रेसर राहील यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन पाटील यांनी केले. तसेच, प्रत्येक शासकीय विभागप्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीतील सर्व कामे अत्यंत काटेकोरपणे पूर्ण करून घ्यावीत असेही निर्देश दिले.

पाटील पुढे म्हणाले की ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेत राज्यातील सुमारे तीन कोटी महिलांना प्रति महिना १५००/-रुपये शासन देणार असून यासाठी प्रतिवर्षी 46 हजार कोटीची तरतूद केलेली आहे. ही शासनाची महत्त्वकांक्षी योजना जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थितपणे समजली आहे का? तसेच या योजनेतील तरतुदी सर्वसामान्य महिला पर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करावेत याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी संबंधित यंत्रणेला केले. तसेच राज्य शासन महिलांसाठी राबवत असलेल्या अन्य योजनांची सविस्तर माहिती देऊन महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीप हंगाम 2023 मधील ५ लाख १९ हजार शेतकरी लाभार्थ्यांना 689 कोटीचे अनुदान प्राप्त झाले असून त्यातील 33 हजार 768 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 489 कोटीचे वाटप झालेले आहे तरी उर्वरित शेतकरी खातेदारांच्या बँक खात्यावर अनुदान रक्कम त्वरित पाठवण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा, असे निर्देश पाटील यांनी देऊन जिल्ह्यातील खरीप पेरणीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा मुबलक पुरवठा होईल या अनुषंगाने कृषी विभागाने दक्षता बाळगावी. तसेच पिक विमा 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना 216 कोटी 25 टक्के आग्रिम मिळणे अपेक्षित असताना ते 136 कोटी मिळालेले असून उर्वरित अग्रीम रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी निर्देशित केले.

पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील ज्या विभागांना मंत्रालय स्तरावरून निधी मिळणे अपेक्षित आहे, अशा मंत्रालय विभागांना पत्र देऊन सदरचा निधी संबंधित जिल्हास्तरीय यंत्रणांना पाठवण्याबाबत पालकमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले. जलयुक्त शिवार अभियान 1.0 मध्ये मधील कामांचा आढावा घ्यावा. या अभियानाचा फायदा शेतकऱ्यांना झाला का याची खात्री करावी. तर जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये उर्वरित 233 गावामध्ये पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी प्रभावीपणे काम करावे, असे त्यांनी सूचित केले.

सोलापूर जिल्ह्यातील पायाभूत प्रकल्पाचा आढावा घेत असताना सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित असून यासाठी पुढील दौऱ्यात स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे पाटील यांनी सांगितले. तसेच सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण होत आलेले असून महापालिकेच्या माहितीनुसार माहे नोव्हेंबर 2024 पर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल. तरी  या सर्व पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामकाजाची पाहणी लवकरच करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शासकीय विभागाने त्यांच्या विभागामार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामे विहित कालावधीत मार्गी लागतील त्यासाठी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता संजय माळी, उपजिल्हाधकारी संतोष देशमुख, महिला-बालकल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकाले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह अन्य संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.