बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची फी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

31

मुंबई : बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही १०० टक्के फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. ७ ऑक्टोबर, २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, अशा सर्व मुलींची १०० टक्के फी शासन भरेल, अशी घोषणा करुन त्याची अंमलबजावणी होण्याबाबत अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत रितसर मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित केला. व्यावसायिक अभ्यासक्रमांची मुलींची १०० टक्के फी सरकार भरेल, यावर अनेकांनी आनंद व्यक्त करताना बिगर व्यावसायिक (Non Professional) अभ्यासक्रमांचीही (कला, वाणिज्य, विज्ञान इ.) १०० टक्के फी शासनाने भरावी, असा मुद्दा उपस्थित केला. त्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण केले.
राज्यात मुलींचे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाचे प्रमाण एकूण विद्यार्थी लोकसंख्येमध्ये ३६ टक्के असून प्रगतीशील राज्यामध्ये हे प्रमाण वाढण्याची आवश्यकता विचारात घेऊन मुलींची शिक्षण फी  १०० टक्के माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.