महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकारचे मानले आभार
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरिता तसेच त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्याकरीता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. संबंधित शासन निर्णयाद्वारे या महामंडळास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या निर्णयाबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकारचे आभार मानले.
तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत. विमाकवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयी-सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” कार्य करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता अनुदान देणे. पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तीऋषी संत सावता माळी समाज मंदिर अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची देखील उपाययोजना महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.