माझ्या बळीराजाला सुखी ठेव, सर्वांना सुख समृद्धी लाभूदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विठुराया चरणी साकडे

35

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रथेप्रमाणे सपत्नीक शासकीय पूजा केली. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर होणाऱ्या या पूजेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती होती. बा विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन माझ्या बळीराजाला सुखी ठेव, सर्वांना सुख समृद्धी लाभूदे, असे साकडे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी घातले. तसेच सर्व वारकरी बांधव आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या.

या वेळी खासदार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते.

 शेतकरी श्री. बाळू शंकर अहिरे, (वय ५५ वर्षे) व सौ. आशाबाई बाळू अहिरे (वय ५० वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना १ वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील १६ वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत.


श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार खालील प्रमाणे देण्यात आले : – 

संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, देहू यांना १ लाखाचा प्रथम पुरस्कार मिळाला. दानेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे यांना ७५ हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, इंदापूर यांना ५० हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या सर्व पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.