अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखं अखेर स्वराज्यात दाखल… या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महायुती सरकारचं अभिनंदन – चंद्रकांत पाटील
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखं अखेर स्वराज्यात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकारचं अभिनंदन आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद दिले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या ऐतिहासिक वाघनखांचे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्वागत करण्यात आलं. पुढील वर्षभरासाठी ती सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. शिवरायांच्या पराक्रमाची यशोगाथा मनामनात रुजावी यासाठी राज्यातील महायुती सरकारने पाठपुरावा करून वाघनखं मायदेशी आणली. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महायुती सरकारचं अभिनंदन आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद!, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
ऑक्टोबर २०२३ मध्ये तत्कालीन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे वाघनखे महाराष्ट्रात आणली गेली. याकरिता ते स्वतः लंडनला गेले. देव, देश आणि धर्मासाठी लढून स्वराज्य हितासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो. याच शक्तीने बलाढ्य योद्धा असलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. शिवरायांचा हा महापराक्रम रोमांच उभा करणारा आहे. म्हणूनच हि वाघनखं स्वराज्य भूमीत आणण्याचा संकल्प मुनगंटीवार यांनी केला होता.