उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

पुणे : आज पुणे येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्य शासनाने विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले.
चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबत माहिती दिली. एकूण ६४२ अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. एकूण १ हजार ८०० कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहे. शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम महाविद्यालयाने योजनेसाठी सुरू केलेल्या स्वतंत्र बँक खात्यात सप्टेंबर महिन्यात जमा करण्यात येतील. या योजनेच्या समन्वयासाठी स्वतंत्र प्राध्यापक नियुक्त करणे आणि योजनेची माहिती विद्यार्थिनींना देण्याबाबत महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या २५ जुलै रोजी राज्यातील ६ हजार महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जिल्ह्यातील नद्यांमधील प्रदूषण, गड-किल्ले संवर्धन, पुरंदर आणि जनाई शिरसाई योजना, देहू आणि आळंदी येथे पोलिसांचे निवासस्थान, बिबट प्रवण क्षेत्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील मनुष्यबळ आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, मेधाताई कुलकर्णी, सुप्रियाताई सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आ. उमाताई खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, दत्तात्रय भरणे, सुनील टिंगरे, चेतन तुपे, सुनील कांबळे, सुनील शेळके, माधुरी मिसाळ, राहुल कुल, भीमराव तापकीर, संजय जगताप, सिद्धार्थ शिरोळे, अतुल बेनके, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त शेखर सिंह, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.