ध्यास, श्वास आणि विश्वास हे सूत्र घेऊन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पुण्यातील बालेवाडी येथे संपन्न – चंद्रकांत पाटील
पुणे : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन रविवारी पुण्यातील बालेवाडी येथे संपन्न झाले. केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या अधिवेशनास राज्यातील सर्वच प्रमुख भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. एकता, अखंडता आणि विविधतेतून साऱ्या राज्याला सामावून घेण्याची क्षमता असलेल्या भारतीय जनता पार्टीचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सह संगठन सरचिटणीस शिवप्रकाश जी, भाजपा महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी, सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे , मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा , रावसाहेब दानवे , खा. अशोक चव्हाण, मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपाच्या राष्ट्रीय मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा राष्ट्रीय सचिव विजयाताई राहटकर जी, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री डॉ. विजयकुमार गावित जी तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या अधिवेशनाबाबत मत व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, ध्यास, श्वास आणि विश्वास हे सूत्र घेऊन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पुण्यातील बालेवाडी येथे संपन्न झाले. केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांनी उपस्थित प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला एक नवी दिशा दिली. नवी उभारी दिली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक कार्यकर्ता मनात नवी उमेद घेऊन नवा संकल्प घेऊन आगामी निवडणुकीच्या विजयाचा दृढ निश्चय करून बाहेर पडला आहे. येतील वादळे, खेटेल तुफान,तरी वाट चालतो..अडथळ्यांना भिवून अडखळणे,पावलांना पसंत नाही..अशा ओली म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.
अमित शाह यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले कि, २०२४ मधल्या सर्व अडचणींवर मात करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भगवा फडकवू ! मी आज येथे जाहीर करतो की, महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल निश्चित आहे. यावेळी प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. शरद पवार सांगायचे की, दूध पावडर आयात करावी लागेल. तसे परिपत्रकही त्यांनी काढले होते. परंतु, मोदी सरकारच्या १० वर्षांच्या काळात एक किलोही दूध पावडर आयात झाली नाही आणि पुढच्या पाच वर्षांत एक ग्रॅम देखील दूध पावडर आयात होणार नाही. लोकांमधे संभ्रम निर्माण करून त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार हे शरद पवार आहेत, असा घणाघात अमित शाह यांनी यावेळी केला. २०१४ साली जेव्हा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु २०१९ ला शरद पवार यांचे सरकार आल्यावर मराठा आरक्षण संपुष्टात आले असल्याचेही ते म्हणाले. यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली. स्वतःला बाळासाहेबांचे पुत्र म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे आज कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, संविधानाने दिलेल्या आरक्षणाची सीमा श्रद्धेय अटल जी आणि नंतर मोदीजी यांनी वाढवल्यामुळे, देशामध्ये आरक्षण सामान्य माणसाला मिळते आहे. तरी देखील आम्ही निवडून आलो की, ‘संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार’, असा खोटा नॅरेटीव्ह पसरवून विरोधकांनी मते मिळवली. परंतु विरोधकांचा हा विजय ‘एखाद्या फुग्या सारखा’, कार्यकर्त्याने टाचणी लावली तरी हा फुगा फुटेल. या विधान परिषदेच्या निवडणुकीपासून हा फुगा फुटायला सुरुवात झाली. खोट्याला खर्याने उत्तर देण्यासाठी, विचार करावा लागत नाही. यावेळी कार्यकर्त्यांना, ‘फेक नॅरेटीव्हला उत्तर देण्यासाठी, आदेशाची वाट पाहू नका, मैदानात उतरा, फक्त हीट विकेट होऊ नका वा सेल्फ गोल करू नका. आदेश विचारू नका, मैदानात उतरून ठोकून काढा’ असेही संगितले.