मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या निधनाने शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली – चंद्रकांत पाटील

49

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. डॉ. स्नेहलता देशमुख प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञही होत्या. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थीहिताचे निर्णय घेऊन त्यांच्या भविष्याला आकार दिला. वयाच्या ८५ व्या वर्षी दीर्घ आजाराने आज त्यांचे निधन झाले.

चंद्रकांत पाटील यांनी डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करताना म्हटले, विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याच्या आईचेही नाव बंधनकारक असावे, हा डॉ. स्नेहलता देशमुख यांनी घेतलेला निर्णय अतिशय उल्लेखनीय आहे. शिक्षण क्षेत्राच्या विकासासोबतच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातही गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयांवर संशोधन करून अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरेल, असा दस्तावेज त्यांनी निर्माण करून ठेवला आहे. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. स्नेहलता देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो!,असे पाटील यांनी म्हणत दुःख व्यक्त केले.

डॉ. स्नेहलता देशमुख यांची १९९५ मध्ये मंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धाडीचे निर्णय घेतले. गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना ‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’, ‘धन्वंतरी पुरस्कार’, हे पुरस्कार देखील मिळाले होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.