स्वप्निल ने कोल्हापूर बरोबरच महाराष्ट्रवासियांची मान अभिमानाने उंचावली – चंद्रकांत पाटील
पुणे : कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील स्वप्नील कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर रायफल ३ या प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिल्याबद्दल त्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. खाशाबा जाधव यांच्या नंतर तब्बल ७२ वर्षानी कोल्हापूरच्या मातीला ऑलिंपिकच्या पदकाचा गुलाल लागला, असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी स्वप्नील कुसळे यांच्या कामगिरीबाबत मत व्यक्त करताना म्हटले कि, स्वप्नीलने कोल्हापूरबरोबरच महाराष्ट्रवासियांची मान अभिमानाने उंचावली. स्वप्नीलच्या यशाने देशातील, महाराष्ट्रातील प्रत्येक नेमबाजाला प्रेरणा मिळाली आहेच शिवाय राधानगरी ते पॅरिस हा प्रवास ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणासाठी स्फूर्तिदायक ठरला आहे. स्वप्नीलचे पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण ४५१.४ गुण प्राप्त केले. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं कांस्यपदक आहे. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. ही तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत.कोल्हापूरातील नेमबाज स्वप्नील हा मध्य रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टर आहे. १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा यांनी कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते.त्यानंतर स्वप्नील हा दुसरा मराठमोळा खेळाडू बनला आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे आहेत.