” नामदार करंडक पर्व २च्या” अंतर सोसायटी एकांकिका स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा नामदार चंद्रकांत पाटील आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न
पुणे : माझ्या कोथरुड मतदारसंघातील नवोदित आणि हौशी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विधानसभा मतदारसंघातील अनेक हौशी कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलाकृती सादर केल्या होत्या. रविवारी या स्पर्धेचा पारितोषिक सोहळा प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, सोसायटीमध्ये हि स्पर्धा राबविण्याची काही करणे आहेत. प्रत्येकाचे आयुष्य हे धावपळीचे असते त्यातून थोडा वेळ काढून एक विरंगुळा यासोबतच काहींचे एकमेकांसोबत काही वाद असतात. या स्पर्धेमुळे सगळे एकत्र येतात आणि हे वाद विसरून जातात असे पाटील म्हणाले. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन आपण विचार केला पाहिजे. यासाठी आम्ही अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित करतो. पाककला स्पर्धा, मंगळागौर स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. अभिनयामध्ये एक वेगळी ताकद आहे. या स्पर्धेमधून खूप चांगले कलाकार तयार व्हावेत, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी विजेत्या संघांचा उत्साह पाहून अतिशय आनंद झाला असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच पाटील यांनी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि स्पर्धेच्या परीक्षकांचे आभार मानले. यावेळी पुणे सांस्कृतिक आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.