महापालिकेच्या माध्यमातून सफाई काम करणाऱ्या महिलांमध्ये बचतीचे प्रमाण वाढावे यासाठी नामदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाऊबीज योजनेची घोषणा
पुणे : भावा बहिणीचे अतूट नाते अधोरेखित करणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून कोथरुड विधानसभा मतदारसंघात पुणे महापालिकेच्या महिला सफाई कर्मचारी भगिनींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून माता भगिनींनी केलेल्या विशेष सत्काराचा स्वीकार केला. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असून, मतदारसंघातील सफाई कर्मचारी भगिनींनी याचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
यावेळी पाटील म्हणाले कि, सफाई कर्मचारी हे आपले खऱ्या अर्थाने रक्षक आहेत. कोव्हीड काळात त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम केले. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवला. त्यांचे आरोग्य आपणा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून सफाई महिला कर्मचाऱ्यांनी आपले आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. यावेळी, महापालिकेच्या माध्यमातून सफाई काम करणाऱ्या महिलांमध्ये बचतीचे प्रमाण वाढावे यासाठी भाऊबीज योजनेची घोषणाही पाटील यांनी केली.
याप्रसंगी भाजपा कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, कार्यक्रमाचे संयोजक महेश पवळे, राजाभाऊ बराटे, विठ्ठल अण्णा बराटे, अनुराधा एडके, दीपक पवार, राज तांबोळी यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि महिला सफाई कर्मचारी भगिनीदेखील उपस्थित होत्या.