पत्रकार बांधवांच्या सर्व समस्या आणि मागण्या सरकारपर्यंत पोचविणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
मुंबई : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार संवाद यात्रा समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विविध मागण्या संदर्भातील निवेदन स्वीकारले.यावेळी मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते.
दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेचा समारोप यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृह, मुंबई येथे आज संपन्न झाला. (२८ जुलै ते 20 ऑगस्ट) 27 जिल्ह्याच्या ठिकाणी आणि दीड शेपेक्षा अधिक तालुक्यातून तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या या यात्रेच्या समारोपाला सरकारच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येऊन पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले . चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सर्व पत्रकार बांधवांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. या सर्व मागण्या सरकारपर्यंत पोचविणार, असे सांगून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी आश्वस्त केले.
यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस विश्वास आरोटे, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे ,समन्वयक संतोष मानुरकर, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी ,अमरावती अध्यक्ष नयन मोढें, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आणि राज्यभरातील प्रमुख पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.