खडकवासला प्रकल्पाच्या नविन मुठा उजवा कालव्याच्या फुरसुंगी बोगदा प्रकल्पास मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता, यासाठी महायुतीचे सरकारचे मनःपूर्वक आभार – मंत्री चंद्रकांत पाटील

17

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण ते फुरसुंगीच्या कालव्यापर्यंत अंदाजे २८ कि. मी. लांबीच्या बोगद्याच्या प्रकल्पास रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे २.१८ टीएमसी पाणी बचत होणार आहे. त्यातून सिंचनासाठी आणि पिण्यासाठीचे पाणी उपलब्ध होणार आहे. या निर्णयासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

खडकवासला प्रकल्पाच्या नविन मुठा उजवा कालव्याच्या फुरसुंगी बोगदा प्रकल्पास मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बोगद्यामुळे पुणे परिसरास सिंचन आणि पिण्यासाठी अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे.

खडकवासला प्रकल्पाच्या नविन मुठा उजवा कालव्याचा कि.मी. १ ते ३४ लांबीचा भाग पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून जातो. पुणे शहराची सर्वांगिण बाजूने होणारी वाढ, झोपडपट्टी, अतिक्रमणे व पर्यायाने होणारे जलप्रदुषण, जलनाश यामुळे कालव्याची हानी झाली आहे. त्यामुळे कालव्याच्या वहनक्षमतेत झालेली घट टाळण्यासाठी नविन मुठा उजवा कालव्याच्या कि.मी.१ ते ३४ मधील लांबीसाठी पर्यायी खडकवासला ते फुरसुंगी पर्यंत बोगदा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे २.१८ टि.एम.सी. पाणी बचत होणार आहे. यातून सिंचनासाठी तसेच बिगर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून सिंचनापासून वंचित राहणारे ३४७१ हेक्टर इतके क्षेत्र पुरस्थापित होणार आहे. या प्रकल्पासाठी २ हजार १९० कोटी ४७ लाख रुपयांच्या तरतुदीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.