युवकांना परदेशात नोकऱ्या, रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व नॅशनल स्कील डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतन, बहिरट पाटील चौक, गोखले रस्ता, शिवाजीनगर येथे स्थापित ‘आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रा’चे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. युरोपसह अनेक देशात कौशल्याधारित काम करणाऱ्या मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता असून येथील युवकांना परदेशात नोकऱ्या, रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले. आज स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रामुळेही येथील युवकांना परदेशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असून त्या सर्वांनाच नोकरी देण्याला मर्यादा असल्याचे सांगून पाटील म्हणाले, पीढ्यान् पिढ्या शेती केल्यानंतर शेतीचे तुकडे झाल्यामुळे शेतजमीन खूप कमी झाली आहे. त्यामुळे एक जण शेतीत आणि एक जण शहरात, विदेशात नोकरीसाठी जावे लागेल. ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संस्था काढल्या परंतु चुकीच्या पद्धतीने चालवल्यामुळे त्यातीलही अनेक बंद पडल्या. त्यामुळे आता युवकांना कौशल्य देऊन, परदेशी भाषांचे शिक्षण देऊन बाहेर पाठवावे लागेल. त्यासाठी हे केंद्र चांगल्या प्रकारे काम करेल. या केंद्राच्या अनुषंगाने स्थानिक सल्लागार मंडळही बनवावे, अशी सूचनादेखील त्यांनी केली.
या प्रसंगी विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, एनएसडीसी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष नितीन कपूर, एनएसडीसीचे सल्लागार मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिंग कौरा आदी उपस्थित होते.