गणेशोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून चंद्रकांत पाटील यांनी घेतला पुढाकार… मतदारसंघातील खड्डे बुजवण्याचे काम घेतले हाती
पुणे : गणेशोत्सव म्हटले कि पुणे शहर आणि तिथली गणेशोत्सवाची लगबग लगेच डोळ्यासमोर येते. पुणे शहरात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. यादृष्टीने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेतली आहे. गणेश मंडळांच्या मागणीनुसार, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले तसेच मतदारसंघातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या काळात कोणतेही गुन्हे घडू नये म्हणून मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, असा आग्रह पोलिसांनी धरला होता. या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला असून, मतदारसंघातील गणेश मंडळांच्या मागणीनुसार, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. याबद्दल मंडळांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यासोबतच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा याकरिता “खड्डेमुक्त कोथरुड” हा पुढाकार देखील पाटील यांनी घेतला आहे. या अंतर्गत लोकसहभागातून मतदारसंघातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले असून यामुळे गणेशोत्सवात कोथरुडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत कोथरुड मतदारसंघातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडीमधील मुख्य रस्त्यांवरील ४० खड्डे, कोथरूड मधील ३०० खड्डे बुजवले आहेत. उर्वरित खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.