आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार यावे, चंद्रकांत पाटील यांचे गणरायाला साकडे
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. गेल्या दहा दिवसांमध्ये शहराच्या विविध भागातील ६०० गणेश मंडळांना भेटी देऊन गणपतीचे दर्शन घेतल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार यावे, असे गणरायाला साकडे घातल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील रात्री गणेश मंडळांना भेटी देऊन निघाले असताना कोथरूड परिसरात मोटार चालकाने ताफ्यातील गाडीला मद्यधुंद मोटरचालकाने धडक दिली. त्यामधून पाटील हे बचावले. संबंधित मोटार चालकासह त्याचे तीन मित्र आणि दोन मैत्रिणींना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले, माझ्याबरोबर असणाऱ्या पोलिसांच्या व सुरक्षारक्षकांच्या कारला एका मद्यधुंद कारचालकाने धडक दिली आहे. माझी कार पुढे गेली आणि आमच्या ताफ्यातील दुसरी कार मागून येत होती. त्याच कारला धडक दिली. यावर गृहमंत्री काय करणार? तुम्ही माध्यमं उगीचच गृहमंत्र्यांवर टीका करताय. पाटील म्हणाले, गृहमंत्री तिथे येऊन सांगणार का, की ही चंद्रकांत पाटलांची कार जात आहे या कारला कोणीही धडक देऊ नका. त्या घटनेनंतर धडक देणाऱ्या कारमधील दोघांना पोलिसांनी पकडलं आहे. त्यांना पोलीस ठाण्यात नेलं आहे. आता यावरून तुम्ही प्रसारमाध्यमं विचारत आहात की गृहमंत्र्यांचा धाक निर्माण होणार आहे की नाही? पुण्यात काय चाललंय वगैरे… मुळात सरकारचा, पोलिसांचा धाक निर्माण होणं हा वेगळा विषय आहे आणि अशा प्रकारच्या घटनेनंतर कारवाई होणं हा वेगळा विषय आहे, असे पाटील यावेळी म्हणाले.
माध्यमांशी बोलताना पाटील पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या विषयात देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करू नका. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले. मराठा आरक्षणाबाबत तथ्य सोडून कोणीही काही बोलू नये. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण दिले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमधील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षण घालवले. आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण दिले आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत कोणीही तथ्य सोडून बोलू नये. देवेंद्र फडणवीस यांना या विषयात लक्ष्य करण्यात येऊ नये, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.