२२ थांब्यांवर वारकऱ्यांना निवासासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून तिथे कायमस्वरुपी स्वच्छतागृहे उभारली पाहिजेत – चंद्रकांत पाटील
पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर येथे आयोजित जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या अंतर्गत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग क्र. ९६५ मोहोळ-आळंदी दिवेघाट ते हडपसरचे चौपदरीकरण, सातारा विभागातील मुळा-मुठा नदीवरील प्रमुख पुलांचे बांधकाम, सिंहगड-वारजे सेवा रस्ता यांसह कोथरुड मधील चांदणी चौकात पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. याप्रसंगी २२ थांब्यांवर वारकऱ्यांना निवासासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून तिथे कायमस्वरुपी स्वच्छतागृहे उभारली पाहिजेत, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. नितीनजींच्या मार्गदर्शनात हे नक्की पूर्ण होईल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. बाणेर-बालेवाडी पाषाण मधील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठीच्या प्रस्तावांवर विचार व्हावा, अशी अपेक्षाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
गडकरी म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा यादृष्टीने महाराष्ट्राचे एक वेगळेपण असून संत महापुरुषांच्या ग्रंथानी, ओव्यांनी आपले जीवन समृद्ध आणि संपन्न केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे भक्तीमार्ग असून या मार्गाने लाखो वारकरी पायी जातात. वारकऱ्यांच्या सुविधेच्या अनुषंगाने दोन्ही पालखी मार्गाकरीता सुमारे १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, श्री विठ्ठल यांच्या प्रतिकृती, विजेची व्यवस्था, वृक्षाची पुर्नलागवड तसेच सुमारे ४२ हजार नवीन झाडे लावण्यात आली आहेत. आगामी काळात स्वयंसेवी संस्था आणि वारकऱ्यांनी या मार्गावर वृक्षारोपण करुन येत्या काळात हरित महामार्ग करण्याकरीता सहकार्य करावे.