सांस्कृतिक वारसा असलेल्या पुण्य नगरीचे आनंदी पुणे करण्यात हास्ययोग परिवाराचा मोठा वाटा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : नवचैतन्य हास्ययोगचा वर्धापनदिन रविवारी पुण्यात संपन्न झाला. या वर्धापन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक वारसा असलेल्या पुण्य नगरीचे आनंदी पुणे करण्यात हास्ययोग परिवाराचा मोठा वाटा आहे. त्यामुळे हास्ययोग परिवाराने आता आनंदी महाराष्ट्रासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
प्रसंगी केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, पीतांबरीचे मुख्य विक्री अधिकारी मंदार फडके,रॉयल पुरंदर चे राजेश कोठारी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धोका, ‘नवचैतन्य’चे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे, सुमन काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, खजिनदार ऍड. रामचंद्र राऊत, जयंत दशपुत्रे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, हास्यक्लब ही आता चळवळ झाली असून, यांसारख्या चांगल्या उपक्रमाची संख्या वाढली पाहिजे. लोकांना आनंद वाटून समाजात नवचैतन्य पेरण्याचे काम करणाऱ्या अनेक अराजकीय संस्था पुण्यात काम करत आहेत. अशा सर्व संस्थांना एकत्रित आणून समन्वयाने काम केले, तर पुणे शहर आनंदी व हसरे होईल. त्यासाठी नवचैतन्य हास्ययोग परिवाराने पुढाकार घ्यावा,” असे प्रतिपादन पाटील यांनी केले. मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे, अशी भावना समाजात रुजावी, सकारात्मकता वाढावी, तसेच हास्ययोग लोकप्रिय व्हावा, यासाठी लिम्का बुक किंवा गिनीज बुक यांसारख्या विश्वविक्रमात त्याची नोंद व्हावी. या विश्वविक्रमी कार्यक्रमाच्या संयोजनात माझा पुढाकार राहील व त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत मी करेल. एकाच वेळी २५ हजार लोक हास्ययोग करत आहेत, असा विक्रमी उपक्रम येत्या काही महिन्यात घेतला जावा,’ असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.
नवचैतन्य हास्ययोग परिवारात आज २३० शाखा, २५ हजार सदस्य आहेत. येत्या काळात एक लाख सदस्य करण्याचे आमचे ध्येय असून, त्यासाठी २५० सोसायट्यांमधून हास्यक्लब सुरु करण्याचा प्रयत्न आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून देशविदेशात आता हास्ययोगाच्या शाखा भरू लागल्यात याचे समाधान आहे. प्राध्यापक, सरकारी कर्मचारी, कंपन्या यांच्यासाठी हास्ययोग कार्यशाळा घेत आहोत”, असे मकरंद टिल्लू यांनी नमूद केले.