पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावर कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे रहदारीचे भाग जोडल्याने पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत व्यापारालाही चालना मिळणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

14

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा १ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ तर टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा स्मारकाचे भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला अर्पण करण्यात आले. या अनुषंगाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन दूरदृष्यप्रणालीद्वारे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, आश्विनी जगताप, आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.

पुण्याचा चहूबाजूनी विस्तार होत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, शैक्षणिक संस्थेचे जाळे वाढत आहेत. याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून प्रदूषणातही वाढ होत आहे, त्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी असून याकरीता मेट्रोसारखे प्रकल्प महत्वाचे आहेत, आगामी काळात मेट्रोचे जाळे वाढविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावर कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे रहदारीचे भाग जोडल्याने पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत व्यापारालाही चालना मिळणार आहे. स्वारगेट येथून शहरातील विविध भागात जाणे शक्य होणार आहे. भिडेवाडा येथील स्मारक हा आपल्या श्रद्धेचा विषय मार्गी लागला आहे, असेही पाटील म्हणाले.

फडणवीस म्हणाले कि, पुणे ही समाजसुधारकांची भूमी असून येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करुन देणारे स्मारक होणे अंत्यत महत्त्वाची गोष्ट आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या पाठिंब्याने भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करुन महिलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली. शिक्षणाचा आणि समाजसुधारणेचा मिळालेल्या वारसाची आठवण करुन देणारे सुंदर असे स्मारकाचे काम सुरु होत असून ते आगामी ५०० वर्ष आपल्या प्रेरणा देत राहील, फडणवीस म्हणाले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.