कोथरुड मतदारसंघातील पाषाण मध्ये कोकाटे तालीमच्या वतीने गणेशोत्सव काळात “सोसायटी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव
पुणे : कोथरुड मतदारसंघातील पाषाण मध्ये कोकाटे तालीमच्या वतीने गणेशोत्सव काळात “सोसायटी गणपती सजावट स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. आज या स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकांना संघटित करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून सार्वजनिक गणेशोत्सव हा समाजप्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम झाला आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही ‘प्रथम तुला वंदितो’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच, आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धाही नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धांमुळे अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. गौरी सजावट स्पर्धेतही हजारो महिलांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे सामाजिक गरज ओळखून कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन याप्रसंगी पाटील यांनी केले.
यावेळी भाजप नेते राहुल कोकाटे, मयूरी कोकाटे, भाजपा उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, सचिन दळवी, फेसकॉमचे खजिनदार रत्नाकर मानकर, ॲड. नितीन कोकाटे आदी उपस्थित होते.